12 July 2022
Dr. Shivkumar Gore
आजच्या कॉम्प्युटर युगातसुद्धा गुदगत या आजाराविषयी फार समज-गैरसमज आहेत. जोपर्यंत शौचाच्या जागी काहीतरी त्रास उदा. आग होणे, रक्त पडणे, बेंड येणे, पू येणे, हाताला मांसल भाग लागणे इ. पैकी काही वाटत नाही, तोपर्यंत आपल्याला शौचाची जागा आहे, आपण तिचा जन्मापासून वापर करतोय याचे कधीच गांभीर्य नसते आणि मग वरीलपैकी त्रास झाल्यावर आपण जागे होतो आणि सुरु होतो एक न संपणारा प्रवास. कारण बोटाला थोडेसे कापले, तर आपण पटकन शेजारच्या डॉक्टरकडे जातो. मुलाला दुखायला लागले, तर आपण बालरोगतज्ज्ञाकडे जातो; परंतु शौचाच्या जागी काही त्रास झाला की मित्र, शेजारी, ओळखीचा, अक्षरश: बसमध्ये शेजारी बसलेला माणूस इ. व्यक्तींचे सल्ले घेतो. त्यापैकी कोणीही मूळव्याधतज्ज्ञ नाही, कोणालाही त्या आजाराच्या बोलीभाषेतील नावाशिवाय काहीही माहिती नाही. ती व्यक्ती रुग्णाला वेगवेगळे प्रयोग करण्यास सांगते व हेसुद्धा १००% ऐकतात का? हे कोडे मला कळालेलच नाही.
प्रत्येक जण त्याच्या आसपासच्या लोकांचे वेगवेगळे किस्से, प्रयोग इ. सांगून रुग्णाला आणखीच गोंधळात टाकतो व चालू राहतो हा न संपणारा प्रवास. मूळव्याध या आजारावर उपचार करणारे भोंदू, स्वयंघोषित वैद्य, कोणतीही वैद्यकीय पदवी नसणारे यांच्याकडे रुग्ण जातो व तीन दाहक, अॅसिड, नवसागर,चुना किंवा धागेदोरे बांधणे इ. गोष्टींचा प्रयोग होत राहतो. माझे सांगणे एवढेच आहे की, आपल्या ५०हजारांच्या गाडीचे पंक्चरसुद्धा आपण थोड्या ओळखीचा व्यक्ती पाहतो, तज्ज्ञ पाहतो, मग आपले लाखमोलाचे शरीर का कोणाच्या ताब्यात द्यायचे! आपण कोणाचेही ऐकतो. कारण ती जागा आपल्याला दिसत नाही. त्यासाठी प्रत्येक जण वेगळ्याच उपचार पद्धती सांगतो. लोकानुभव वेगळेच असतात. अशा प्रकारे मूळव्याध म्हणजे गोंधळच-गोंधळ.गोंधळून टाकणारा आजार. एक वेळेस हार्ट अटॅक माणसाला समजेल; परंतु मूळव्याध नाही. यासाठी मग कायकरावे, तर आपल्या जवळील मूळव्याध व भगंदरतज्ज्ञ डॉक्टरकडे जाये. आपली सर्व लक्षणे सांगावीत, आजाराचा काळ, सोबत इतर आजारांचे वर्णन सांगावे.
बऱ्याच वेळा ब्लड प्रेशर, हृदयरोग,मानसिक रोग, कॅन्सर इ. आजारांची औषधे हळूहळू उष्णता वाढवतात व मूळव्याध, फिशर इ. आजार उद्भवतात याचे संपूर्ण ज्ञान डॉक्टरांना असते. शौचाच्या जागी फक्त मूळव्याध न होता इतर १२ प्रकारचे आजार होतात. प्रत्येक आजाराच्या ३ ते ४ अवस्था मिळून वेगवेगळी ५० लक्षणे होतात व प्रत्येकाची उपचाराची दिशा वेगवेगळी असते. जसे आपण अगोदर पाहिले, कोणीही उपचार सांगतो म्हणजे तो फक्त न पाहता मूळव्याध या आजारावरील त्याला माहीत असलेले औषध सांगतो. त्यावर रुग्णाचा वेळ व पैसा दोन्ही खर्च होऊनही आजार बळावत जातो. म्हणून तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊन व्यवस्थित प्रोटोस्कोपी करून तपासणी करावी व आतील आजारांचेसुद्धा असणारे, नसणारे तपासून घेऊन त्याची उपचाराची दिशा ठरवावी. आज आयुर्वेदामध्ये मूळव्याध, भगंदर, फिशर, गुदगत ग्रंथी, विद्रधी, पिलोनिडल सायनस, अॅनल वार्टस्, गुदकंड़ बाह्यार्श इ. आजारांचे सविस्तर वर्णन केलेले आहे व त्याच्या प्रत्येक अवस्थेनुसार विनाऑपरेशन तोसुद्धा फक्त ३० मिनिटांचा उपचार शक्य आहे.
आयुर्वेदामध्ये लवकर गुण येत नाही, असा समाजामध्ये पसरलेला गैरसमज आहे; परंतु आज क्षारकर्म, क्षारसूत्र, अग्निकर्म, क्षारलेपन इ. उपचार पद्धतीमध्ये वेगवेगळे संशोधन करून रुग्णांवर यशस्वीरीत्या उपचार करून ही पद्धती तयार केली आहे. याचा फायदा म्हणजे मूळव्याध व इतर आजारांवर कोणतेही ऑपरेशन न करता, कोणताही अवयव, स्नायू न कापता कायमस्वरुपी उपचार शक्य आहे. म्हणून सामान्य जनता व इतरांनी अशी लक्षणे दिसल्यास लवकरात लवकर तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासून घ्यावे व आजारामधून मुक्त व्हावे.
मूळव्याध आजाराचा त्रिसूत्रि उपचार ?
Posted On : 12 July 2022मूळव्याध : गोंधळात टाकणारा आजार
Posted On : 12 July 2022